मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. मात्र, वानखेडे यांची बदली झाली तर त्यांच्याविरोधातील लढाई सुरु राहणार, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. समीर वानखेडे यांचा फर्जीवाडा मी उघड केला होता. त्यांना मुदतवाढ मिळाली नाही हे चांगलं झालं. मी या प्रकरणात पाठपुरावा करणार आहे. त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून काही लोक प्रयत्न करत होते. जर त्यांना ही मुदतवाढ मिळाली असती तर त्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मी एक्सपोज केलं असतं, असं मलिक यांनी सांगितलं. मात्र, आता वानखेडे यांना मुदतवाढ न मिळाल्याने त्यांच्यासाठी लॉबिंग करणाऱ्यांची नावे सांगणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच वानखेडेंची बदली झाली असली तरी त्यांच्याविरोधातील लढाई सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी लखीमपूर हिंसेवरही भाष्य केलं. लखीमपूर प्रकरणात मंत्र्याचा मुलगा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर चार्जशीट फाईल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्र्यांना वाचवत आहेत. म्हणजे त्यांची पाठराखण केंद्र सरकार करत आहे. अशा मंत्र्याची हकालपट्टी करण्याची गरज आहे. मुलगा हत्येचा कट करतो, तरीही मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही. म्हणजे या कृत्याचीच पाठराखण केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदींबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्यावरही मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींचं ते विधान योग्य नाही. हे सत्य असेल तर देशाची जनता मोदी साहेबांना माफ करणार नाही, असं ते म्हणाले.