नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे लढून स्वातंत्र्य मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला लगावला.
संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना हा टोला लगावला. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणाव, दबाव आणि दहशतीखाली होता. त्याचं जोखड आता निघालं आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? कंगना रणावत सांगते ते स्वातंत्र्य नाही किंवा विक्रम गोखले म्हणतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरचं जोखड निघून जातं, फेकलं जातं. ते स्वातंत्र्य असतं, असा टोला राऊत यांनी लगावला. तीन काळे कायदे रद्द होत आहेत, शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं. भिकेत मिळवलेलं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिलं. जालियनबागेत ब्रिटिशांनी आमच्या वीरांना चिरडलं. त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीतही या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना चिरडून मारलं. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला आजची सकाळ स्वातंत्र्याची पहाट वाटतेय, असंही ते म्हणाले.
राज्यकर्ते कोणी असो. शेतकरी हा आपल्या शेतीचा मालक नसून गुलाम बनविण्याचा हा कायदा होता. नव्या प्रकारची कार्पोरेट जमीनदारी या देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनी ज्या पद्धतीने या देशात घुसली आणि राज्य आणि देश पारतंत्र्यात टाकला, त्या पद्धतीने भांडवलदारांना नव्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला होता. या देशातील शेतकऱ्यांनी एकजुटीने दीड वर्ष लढा दिला. पोलिसांनी गोळीबार केला… मंत्र्यांनी चिरडले. पण पंजाब हरयाणाचा शेतकरी मागे हटला नाही. मोदी सांगत होते तसे हे शेतकरी दोन राज्यांचेच नव्हते. या दोन राज्यातील शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत होते. शेवटी सरकारला झुकावं लागलं, असं त्यांनी सांगितलं.
म्हणून मोदींनी माफी मागितली
मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागितली नाही. मोदी हे पंतप्रधान आहेत. अमानुष बहुमताचा गैरवापर करून त्यांनी कायदे आणले. त्यामुळे ७०० शेतकऱ्यांना मरणाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली, असं त्यांनी सांगितलं. कायदे रद्द झाले. पण ते सद्भभावनेने रद्द केलेले नाही. शेतकरी मागे हटायला तयार नाही. असंतोष वाढत चालला आहे. १३ राज्याच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपच पराभव झाला आणि उद्याच्या पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निडणुकीत पराभव होईल या भीतीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ !
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केलीय. पाटील यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी कृषी कायद्यावरुन भाजपवर जोरदार टीका केलीय. दीड वर्षांपासून शेतकरी तणाव, दबावात होता. त्या जोखडातून तो बाहेर निघाला आहे. विक्रम गोखले, कंना रनौत यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी असेल. शेतकऱ्यांना मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा होता. गाड्या घातल्या, गुंड पाठवले. मात्र, शेतकरी हटला नाही. हे स्वातंत्र्य आहे. हे लढवून मिळालं आहे, भीकेतून नाही. जालियनवाला बागेत ईस्ट इंडिया कंपनीने गोळ्या घातल्या. तसंच शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.
नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांची सेंच्यूरी नक्की
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या विजयाचा दावा केलाय. नाशिकमध्ये महापालिका निवडणूक आहे. १०० च्या खाली नगरसेवक देणार नाही असं इथले नेते सांगतात. जेवढे द्याल तेवढे कमीच आहेत. इथला प्रत्येक माणूस 10 नगरसेवकांचा मालक आहे. आपली सेन्च्यूरी नक्की आहे, असा विश्वास राऊत यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केला.
नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेकांना जमिनीवर आणण्याची आवश्यकता आहे. या पेक्षाही मोठा कार्यक्रम झाला असता. पण पोलिसांनी परवानगी दिली नाही. अमरावतीमध्ये काही झालं म्हणून नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम घ्यायला परवानगी दिली नाही. अमरावतीत जे झालं ते नाशिकमध्ये कधीच होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
कंगना रनौत, विक्रम गोखलेंवर टीका
पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी जिंकला, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. शेतकरी जिंकला म्हणून मलाही वाटतं की देशाला आज स्वातंत्र्य मिळालं. आज स्वातंत्र्य मिळालं असं फक्त कंगना किंवा विक्रम गोखले यांनाच वाटलं पाहिजे का? देशात आज चले जावं सारखी परिस्थिती आहे. महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं आहे, अशी टीकाही राऊत यांनी केलीय.