पुणे: अँटालिया प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नवा बॉम्ब फोडला आहे. अँटेलिया प्रकरणात मनसुख हिरेन यांची हत्या झाली नसती किंवा हिरेन यांनी पोलिसांकडे शरणागती पत्करली असती तर एका गुंडाचा फेक एन्काऊंटर करण्याचा सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांचा डाव होता. या गुंडाचा फेक पासपोर्ट तयार करून तो पाकिस्तानात जाऊन आल्याची एन्ट्रीही करण्यात आली होती, असा धक्कादायक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अँटालियाप्रकरणी धक्कादायक माहिती दिली. सीबीआय, ईडी आणि इतर तपास यंत्रणेबाबत ते कोणत्या पद्धतीने कामगिरी करत आहे हे लपून राहिलं नाही. अँटिलिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती आज ना उद्या समोर येणार आहे. या प्रकरणात एक फेक पासपोर्ट तयार करण्यात आला होता. एका छोट्यामोठ्या गुंडाच्या नावाने हा पासपोर्ट तयार केला गेला. त्यावर पाकिस्तानची एक्झिट आणि एन्ट्री दाखवण्यात आली होती. वाझे आणि परमबीर सिंगने हा फेक पासपोर्ट तयार केला होता. मनसुख हिरेनची हत्या झाली नसती किंवा हिरेन पोलिसांकडे शरण आला असता तर परिस्थिती वेगळी दिसली असती. त्या गुंडाचं फेक एन्काऊंटर करण्याचं षडयंत्रं होतं. वाझे आणि सिंग यांचं हे षडयंत्रं होतं. वाझेच्या घरातून हा फेक पासपोर्ट मिळाला आहे. पंचनाम्यात तो पासपोर्ट आहे. एनआयएने ही माहिती उघड करावी, असं आवाहन मलिक यांनी केलं.
राज्य सरकारला दोन वर्ष झाली आहेत. पण या काळात सिंग सारख्या अधिकाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत, असं मलिक यांना विचारण्यात आलं. त्यावर, हे सर्व पॉलिटिकली मोटिव्हेटेड होतं. अँटेलिया बाहेर बॉम्ब ठेवण्याचं कारस्थान वाझे आणि सिंग यांनी मिळून केलं होतं. सरकारला ब्रिफिंग करत असताना वेगळ्या पद्धतीने ब्रिफिंग दिली गेली. सिंग आणि वाझे हेच सरकारला ब्रिफिंग करत होते. त्यामुळे आम्ही ते अधिवेशनात मांडत होतो. हे दोघेही अधिवेशन सुरू असताना सरकारची दिशाभूल करत होते, असं त्यांनी सांगितलं.
हत्येच्या घटनेनंतरही वाझेंनी सरकारची दिशाभूल केली. सत्य समोर आल्यानंतर सिंग यांची बदली होम गार्डला करण्यात आली. बदली केल्यानंतर सिंग यांनी ईमेल द्वारे तक्रार दाखल केली. नंतर सीबीआय आली. गुन्हा दाखल केला. तेव्हा देशमुखांनी राजनीमा दिला. आता हे प्रकरण कोर्टात आहे. पण हा संपूर्ण विषय पॉलिटिकली मोटिव्हेटेड होता. चांदीवाल कमिशनचं कामकाज सुरू आहे. अहवाल आल्यावर सत्यस्थिती बाहेर येईल, असंही ते म्हणाले.
फडणवीसांच्या दाव्याची खिल्ली
२०२४ मध्ये भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल असा दावा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या दाव्यावर नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावलाय.
राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आता आम्ही राज्यसरकार पाडणार नाही. हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ अशी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मविआ सरकार पडणार नाही हे ते आता स्वीकारत आहेत, असा टोला मलिकांनी लगावलाय. तसंच २०२४ साली हे सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येईल. मुख्यमंत्री महोदयांना विश्वास आहे की, हे सरकार केवळ पाच वर्षांसाठी नाही तर २५ वर्षांसाठी एकत्र आले आहे, असे सांगत मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारमधील एकजुटीची भावना माध्यमांपुढे मांडली.
सरकारची ‘बाते कम, काम जादा’ अशी भूमिका
महाविकास आघाडी सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सरकारची ‘बाते कम, काम जादा’ अशी भूमिका असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसरकारच्या कामकाजाचा आढावा माध्यमांसमोर मांडला.
सरकार सत्तेत आल्यावर सर्वप्रथम मागील सरकारच्या काळात प्रलंबित शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला. सरकार सत्तेत आल्यानंतर दुर्दैवाने तीन महिन्यातच देशात कोरोनाचे संकट आले. मात्र यात देशभरात जी दुर्दैवी परिस्थिती आपण पाहिली तशी परिस्थिती राज्यसरकारने राज्यात निर्माण होऊ दिली नाही. यासाठी कोविड सेंटर्स, टेस्टींगमध्ये वाढ, ऑक्सिजनसाठा अशा सर्व गोष्टींचा पुरवठा राज्यसरकारने वेळोवेळी केल्याचे मलिक यांनी सांगितले.