फडणवीसांनी पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीत जायला हवे होते : बाळासाहेब थोरात
कार्यकर्त्यांसाठी विरोधी नेत्याने पोलीस ठाण्यात जाणे योग्य नाही...
संगमनेर : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला काल विलेपार्ले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप नोंदवला. फडणवीस आणि दरेकर यांच्या या भूमिकेवर सत्ताधाऱ्याकडून जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील फडणवीस आणि दरेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
देशावर आणि राज्यावर करोनाचे संकट आले असून अशा परिस्थितीत राजकारण केले जाऊ नये, मात्र दुर्दैवाने तेच घडत आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलिस स्टेशनला जाण्याऐवजी दिल्लीला गेले असते, तर तेथून महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी मदत झाली असती. मात्र ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तो कंपनीवाला त्यांचा कार्यकर्ता आहे. म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी पोलिस ठाण्यात जाणे योग्य नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिसांनी काल रात्री दमन येथील ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर रात्री पोलिस ठाण्यात गेले. तेथे जात त्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आक्षेप घेतला.