
मुंबई – राजकारण्यांचा हुकमी एक्का म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली. भाजपचे फाइंड असणाऱ्या किशोर यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेसाठी काम केलं होतं. आता, हेच प्रशांत किशोर राष्ट्रवादीच्या पवारांना भेटायला आल्याने काही नवीन गणिते जुळत आहेत का याची चर्चा रंगली होती. या भेटीनंतर भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी स्ट्रॅटेजीचं उत्तर दिलंय. कोणी कोणाची भेट घ्यावी, यावर कुठलही बंधन नाही. विरोधी पक्षाचे लोकं असूद्या किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते असूद्या. प्रत्येकजण आप-आपली स्ट्रॅटेजी तयार करत असतात. कोणी कितीही स्ट्रॅटेजीस् तयार केल्या तरी आजही मोदीच आहेत आणि २०२४ लाही मोदीच राहणार आहेत. २०२४ च्या निवडणुकांतही मोदींच्या नेतृत्वातच भाजपाचं सरकार येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेकडूनही भेटीचं स्वागत
बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागतच आहे. देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आहे. त्यामुळे शरद पवारांनीही तो विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी शिवसेनेचे कौतुक केलंय, असंही सावंत यांनी म्हटलं.