Top Newsफोकस

मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाले असून, येत्या २४ तासांत त्याचा प्रभाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. कमी दाबाच्या क्षेत्राचा पुढील प्रवास पश्चिम – उत्तर – पश्चिम दिशेने होण्याची शक्यता असून, याच्या परिणामामुळे पश्चिम किनारी पुढील तीन ते चार दिवस जोरदार वारे वाहतील. शिवाय राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. कोकण, मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव अधिक असणार असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हयांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या व्यतीरिक्त घाट भागातदेखील जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडील माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १५ सप्टेंबर रोजी पालघर जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १६ सप्टेंबर रोजी मात्र पावसाचा जोर किंचित कमी होईल. दरम्यान, रविवारी सकाळी मुंबईत पावसाने ब-यापैकी हजेरी लावली. पहाटे, सकाळी आणि दुपारी साडे बारा वाजेपर्यंत मुंबईत बहुतांश ठिकाणी अधून मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी दोन नंतर मात्र पावसाने मुंबईत ब-यापैकी विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना सुर्यनारायणाने दर्शन दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button