नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काँग्रेस श्रेष्ठींनी दणका दिला आहे. नितीन राऊत यांची अनुसुचित जाती (एससी) विभागाच्या अध्यक्षपदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता माजी आमदार राजेश लिलोठिया यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजेश लिलोठिया यांची एससी विभागाच्या अध्यक्षपदासाठी नियुक्ती केली असल्याचं काँग्रेसचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसनं आज पत्रक काढून एससी विभागाच्या नव्या अध्यक्षांची घोषणा केली आहे. राजेश लिलोठिया यांची अनुसुचित जाती (एससी) विभागाच्या अध्यक्षपदी, तर के.राजू यांची काँग्रेसच्या अनुसुचित जाती/ओबीसी/अल्पसंख्याक आणि अखिल भारतीय आदिवासी विभागाच्या कामकाजाची देखरेख करण्यासाठी समन्वयक पदावर नियुक्ती केली आहे. दोन्ही नियुक्त्या तात्काळ स्वरुपात लागू होणार असल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी आजवर एसीसी विभागासाठी दिलेल्या योगदानाबाबत काँग्रेस पक्षाकडून आभार देखील व्यक्त केले आहेत.