रत्नागिरी : भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेवरून महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. विशेष करून नारायण राणे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसून, शिवसेनेकडूनही नारायण राणे आणि भाजपला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेने रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी हे काही कामाचे नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे, बैलांसारखे राबत असल्याचे विधान केले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उदाहरण देत असल्याचे सांगितले होते. दानवेंच्या या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले असून, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
भाजपच्या नेत्यांना केंद्रातील सत्तेची मस्ती आली आहे. त्यातून त्यांची विकृती दिसून येते. दानवेंची बुद्धी भ्रष्ट झाली असून, त्यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, या शब्दांत विनायक राऊत यांनी टीका केली आहे.