कोरोना उपचारावरील खर्चाला आयकरात सूट; मोदी सरकारची घोषणा
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव गेला असून कित्येक कुटुंब आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेत. या लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. कोविड उपचार आणि मृत्यू नंतर झालेल्या खर्चाच्या रक्कमेला आयकरातून सूट देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली आहे.
मंत्री ठाकूर म्हणाले की, केंद्र सरकारने कोविड १९ मृत्यू अथवा उपचारादरम्यान खर्च करण्यात आलेल्या रक्कमेवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर कोणत्याही कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना उपचारासाठी मदत केली असेल अथवा कोणा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मदत केली असेल तर त्या रक्कमेला करात सवलत देण्यात येईल. याचा अर्थ ज्या व्यक्तीने त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी अथवा दुसऱ्या कोणासाठी आर्थिक मदत केली असेल तर त्याला आयकरातून सूट दिला जाईल असं ते म्हणाले.
त्याचसोबत कोरोना उपचारासाठी ज्याला आर्थिक फायदा दिला आहे त्यालाही कोणताही कर आकारण्यात येणार नाही. इतकचं नाही तर कोरोना मृत्यूनंतर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अथवा एका व्यक्तीने दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांना ठराविक रक्कम दिली असेल. त्या रक्कमेलाही करातून वगळण्यात आलं आहे. या ठराविक रक्कमेची मर्यादा १० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षानंतर झालेल्या या मदतींसाठी हा निर्णय झाला आहे अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.
पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याला मुदतवाढ
केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या शेवटच्या तारखेला ३ महिन्याची मुदतवाढ दिली आहे. म्हणजे ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक करता येईल. यापूर्वी याची अंतिम मुदत ३० जून २०२१ पर्यंत होती. तुम्ही एसएमएसद्वारे, आयकर विभागाच्या वेबसाईट आणि जवळच्या पॅन सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड लिंक करू शकता. त्याचसोबत सरकारने करदात्यांना आणखी एक दिलासा दिलाय तो म्हणजे टीडीएस फाइल करण्याची अखेरची तारीख १५ जुलै केली आहे जी ३० जून २०२१ होती.