
लखनौ : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारकडून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. नुकतेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंगणवाडी सेविकांच्या (आशा वर्कर) मानधनात वाढ केली आहे. तर, राज्य सरकारने कोरोना काळात केलेल्या कामांची जाहिरातबाजीही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल, असा विश्वास योगींनी व्यक्त केला. तसेच, मी पुन्हा येईन म्हणत मुख्यमंत्रीपदी आपणच विराजमान होणार असल्याचे त्यांनी म्हटलं.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांत कुठलाही मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आला नाही? असा प्रश्न मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना योगींनी ‘मै आऊंगा’ म्हणत मी पुन्हा येईन, असेच म्हटले आहे. तसेच, आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठीच आलो आहोत, माझा जो ट्रेंड सुरू आहे. त्यानुसार, भाजपला ३५० पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, असे म्हणत एकहाती सत्ता येणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी टाइम्स नाऊने म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असाच विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार, भाजपला सर्वाधिक जागाही मिळाल्या. ते पुन्हा मुख्यमंत्रीही बनले होते. मात्र, दीड दिवसांतच त्यांचं सरकार कोसळलं होतं. फडणवीस यांची मी पुन्हा येईन… ही कविता महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली होती.
कोरोना विषाणू विरोधात अतिशय नेटानं प्रतिकार केल्याचा दावा करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी कुशीनगर येथील जनसभेला संबोधित करताना एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. “देशातील इतर राज्यांची सरकारं कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. पण आम्ही तर कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद करुन टाकलं आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान केलेलं असलं तरी आम्ही केंद्र सरकारच्या साथीनं जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.