Top Newsराजकारण

मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा दावा

मराठवाड्यात जलयुक्तमुळे पूर आल्याचा दावा हास्यास्पद, चंद्रकांत पाटलांचा टोला

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांना एकामागून एक चक्रीवादळे आणि अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यातच आता पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. तसेच ही योजना अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेल्यामुळे मराठवाड्यात ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोपही देऊळगावकर यांनी केला. मात्र, भाजपने देऊळगावकर यांनी केलेला दावा आणि आरोप फेटाळून लावला आहे.

मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करताना नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणे हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. त्याच वेळेला अनेक तज्ज्ञमंडळींनी तुम्ही नदीशी छेडछाड करू नका, असे सांगितले होते. सर्व कामे बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तशी आखणी केली जाते. ते करताना तज्ज्ञांना किंवा अभ्यासकांना कोणीही विचारत नाही. त्याची ही परिणीती आहे, अशी टीका देऊळगावकर यांनी केली.

जलयुक्त शिवार योजना राबवताना काही ठिकाणी वाळू उपसली गेली. खरे पाहता नैसर्गिकरित्या पूर आटोक्यात आणणारे हे घटक आहेत. वाळू, आजूबाजूची झाडी, ती नष्ट झाल्यामुळे माती नदीच्या पात्रात जाऊन बसली. आता नदीच्या पात्रात किती माती आहे, हे मोजले पाहिजे. ती माती पाण्याला मुरू देत नाही. त्यामुळे प्रवाह वाढतो. मांजरा नदी तीन-तीन किलोमीटर कशी पसरते, पात्र ओलांडते, या सगळ्याची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी देऊळगावकर यांनी केली.

दरम्यान, एखाद-दुसरे काम खराब झाले असेल, तर संपूर्ण योजनेला दोष देणे चुकीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे म्हणणे योग्य नाही, उलट दुष्काळाच्या परिस्थितीत जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी सदर दावे, आरोप फेटाळून लावले.

मराठवाड्यात जलयुक्तमुळे पूर आल्याचा दावा हास्यास्पद, चंद्रकांत पाटलांचा टोला

महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये जलयुक्त शिवार योजनेवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. चंद्रकांत पाटील यांनी यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यातील लोकांना चांगला फायदा झाला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, जलशिवार योजनेच्या तांत्रिक अडचणींमुळे मराठवाड्या पूर आला असल्याचे सांगण्यात येत आहे. जलशिवाराच्या तांत्रिक अडचणींमुळे झालं नाही तर महापुराचा परिणाम हा पावसामुळे झाला आहे. जलयुक्त शिवाराची झालेली कामे ही किती उपयोगी आहेत. पाण्याचा कसा साठा होत आहे. त्या पाण्याचा वापर कसा होणार आहे हे सिद्ध झालं आहे. परंतु जलयुक्त शिवाराच्या बांधकामामुळे पूर आला असे म्हणणे हास्यास्पद असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button