
अबुधाबी : मागील एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाने टी२० विश्वचषकातील कामगिरीही विजयाच्या दिशेनेच सुरु केली आहे. सुरुवातीच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला ६ विकेट्सनी मात दिल्यानंतर आता इंग्लंडने बांंग्लादेश संघावरही ८ गडी राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे ग्रुप १ मध्येही ते अव्वल स्थानी पोहोचले आहेत.
अबुधाबीच्या शेख जायद मैदानात पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. पण हा निर्णय़ इंग्लंडच्या बोलर्सनी साफ चूकीचा ठरवत बांग्लादेशला अवघ्या १२४ धावांवर रोखलं. बांग्लेदशकडून मुशफिकूर रहिम याने केवळ २९ इतक्याच सर्वाधिक धावा केल्या. पण इंग्लंडकडून मात्र अनुभवी टायमल मिल्सने उत्कृष्ट अशा ३ विकेट्स मिळवल्या. तर लिव्हिंगस्टन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर ख्रिस वोक्सनेही एक विकेट घेतली. त्यामुळे अवघ्या १२४ धावांवर बांग्लादेशचा डाव आटोपला.
अवघ्या १२५ धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाने सुरुवातच जबरदस्त केली. सलामीवीर जेसन रॉयने ३८ चेंडूत ६१ धावा करत विजयाच मोलाचं योगदान दिलं. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर बटलरने १८, डेविड मलानने नाबाद २८ आणि जॉनी बेयरस्टोवने नाबाद ८ धावा करत संघाचा विजय पक्का केला.
सुपर १२ चे दोन ग्रुप असून ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. यामध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात ४ गुण आहेत. तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाने १ पैकी १ सामना जिंकत अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळवलं आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेने २ पैकी १ सामना जिंकत चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही सामने पराभूत होत बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.