
हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला ७८ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला. मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या २ बाद २१५ वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित ८ विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव २७८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात भारतावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ऑली रॉबिन्सनला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
धावांच्या डोंगरापेक्षा तीन दिवस खेळपट्टीवर टिकून राहणे, हे टीम इंडियासमोर खरे लक्ष्य होते. इंग्लंडनं पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेत त्यांची बाजू मजबूत केली होती. त्यांच्या गोलंदाजांना फक्त लाइन लेन्थवर मारा करून टीम इंडियाच्या फलंदाजांना चूक करण्यास भाग पाडायचे होते. तिसऱ्या दिवशी खेळपट्टीनं त्यांना फार साथ दिली नाही, परंतु चौथ्या दिवसाच्या पहिल्या दीड तासांच्या खेळात भारताच्या फलंदाजांनी चुकांचे सत्र सुरू केले. ऑली रॉबिन्सननं त्याचाच फायदा उचलताना पाच महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. २ बाद २१५ धावांवरून टीम इंडियाची घसरगुंडी सुरू झाली. भारताचे ८ फलंदाज ६३ धावांवर माघारी पाठवून इंग्लंडनं मोठा विजय मिळविला.
पुजाराला चौथ्या दिवसाच्या खेळात एकही धाव करता आली नाही. १८९ चेंडूंत १५ चौकारांसह तो ९१ धावांवर माघारी परतला. कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दारी होती. कोहलीनं अर्धशतक पूर्ण केले, पण रॉबिन्सन यानं त्यालाही चालतं केलं. कोहली १२५ चेंडूंत ५५ धावांवर गेला. त्यानंतर जेम्स अँडरसननं टीम इंडियाला मोठा धक्का देताना रहाणेला ( १०) बाद केलं. रॉबिन्सनची गाडी सुसाट सुटली अन् रिषभ पंतला ( १) बाद करून त्यानं विकेट्सचा चौकार खेचला. भारतानं २४ धावांत चार फलंदाज गमावले. रूटनं गोलंदाजीत बदल करताना चेंडू मोईन अलीच्या हाती सोपवला अन् त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अलीनं मोहम्मद शमीचा ( ६) त्रिफळा उडवून टीम इंडियाचा पाय आणखी खोलात टाकला. रॉबिन्सननं डावातील पाचवी विकेट घेताना इशांत शर्माला ( २) झेलबाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या.
चेतेश्वर पुजाराचं शतक पुन्हा हुकलं
खराब फॉर्म आणि धिम्या स्ट्राईक रेटमुळे सतत टीकेचा सामना करणाऱ्या भारतीय कसोटी संघातील आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात चमकदार फलंदाजी केली. त्याची फलंदाजी पाहून असे वाटले की, पुजारा त्याचा दोन वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपवेल. तो या दिशेने सहजतेने जात होता, पण तसे होऊ शकले नाही. पुजाराने शानदार फलंदाजी केली पण त्याला शतकाचा दुष्काळ संपवता आला नाही. ९१ च्या वैयक्तिक धावसंख्येवर तो ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवर पायचित झाला. ३ जानेवारी २०१९ रोजी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुजाराने आपले शेवटचे शतक झळकावले होते. त्या सामन्यात पुजाराने १९३ धावांची खेळी केली होती. यानंतर त्याने काही अर्धशतकं झळकावली, मात्र त्याला त्याचे शतकात रुपांतर करता आले नाही. आजही त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली.
जेवढं लढू शकतो तेवढं लढलो : विराट कोहली
या पराभवानंतर विराट कोहली म्हणाला, पहिल्या डावातील धावसंख्येमुळे दडपण निर्माण झाले होते. तुम्ही जेव्हा ८० धावांच्या आत गडगडता तेव्हा प्रतिस्पर्धींना मोठी आघाडी घेण्याची संधी देता. पण, आम्ही काल चांगला खेळ केला होत, जेवढं लढू शकतो तेवढं लढलो. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी आज अप्रतिम गोलंदाजी करून दडपण वाढवलं अन् त्यांना हवा तो निकाल लावला. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असेल असे आम्हाला वाटले, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीनं आम्हाला चुका करण्यास भाग पाडले.
नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेतली याचे शल्य नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, कारण आम्ही चांगली गोलंदाजी करू शकलो नाही. त्याचाच परिणाम सामन्यावर झाला. मधल्या फळीनं पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. अजूनही मालिका गमावलेली नाही. दोन सामने आहेत आणि आम्ही कमबॅक करू, असा विश्वासही विराटनं व्यक्त केला.