पासवान काका-पुतण्याच्या वादात आयोगाने लोजपाचे निवडणूक चिन्ह गोठवले !

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टीच्या दोन गटात सुरू असलेला वाद सुटेपर्यंत लोकजनशक्ती पार्टीचे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी आधी सांगितले की, याबाबतचा निर्णय हा ४ ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल. हा निर्णय शनिवार आणि सोमवारच्या दरम्यान, होईल. बिहारमधील दोन विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकनाची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी निवडणूक आयोग तीन पर्यायांवर विचार करत होता. अंतिम निर्णय घेईपर्यंत पक्षाचे निवडणूक चिन्ह अंतरिम आदेशापर्यंत फ्रीज करणे आणि पक्षाच्या दोन गटांना वेगवेगळ्या चिन्हांसह पोटनिवडणूक लढण्याची परवानगी देणे. लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या गटाकडे निवडणूक चिन्ह कायम ठेवणे किंवा पशुपती पारस यांच्या गटाला लोजपाचे पार्टी सिंबॉल देणे.
दरम्यान, चिराग पासवान यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाचा दौरा केला होता. तसेच पक्षाचे निवडणूक चिन्ह त्यांच्या पक्षाकडे कायम राहावे, अशी विनंती केली होती. लोकजनशक्ती पार्टीच्या एका गटाचे नेतृत्व पक्षाध्यक्ष चिराग पासवान करत आहेत. तर पक्षाच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व त्यांचे काका आणि केंद्रीय कॅबिनेटमंत्री पशुपती पारस करत आहेत. लोकजनशक्ती पार्टीमध्ये हे संकट यावर्षी जून महिन्यात सुरू झाले होते. तेव्हा पाच खासदार पासवान यांचा गट सोडून पारस यांच्या गटात गेले होते. त्यानंतर पारस यांनी स्वत: पाटणामध्ये स्वत:ला पक्षाचा अध्यक्ष घोषित केले होते.