Top Newsराजकारण

‘निवडणूक चाणक्य’ प्रशांत किशोर यांची राहुल गांधींशी चर्चा

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची गेल्या महिन्यात तीनवेळा भेट घेणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला पोहोचले आहेत. नवी दिल्लीत राहुल यांच्या निवासस्थानी आज दुपारी ही भेट झाली. या बैठकीला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि वरिष्ठ नेते वेणुगोपालदेखील उपस्थित होते. पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह ५ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल आणि किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट झाली होती. एकाच महिन्यात तीनदा पवार आणि किशोर यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आता किशोर काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीला पोहोचले आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणीपूर, गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल आणि किशोर यांची भेट होत असल्याचं बोललं जात आहे.

पंजाबमध्ये सध्या काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्ध यांच्यात शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाबमध्ये २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत किशोर यांनी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम केलं होतं. राज्यात काँग्रेसची सत्तादेखील आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि राहुल गांधींना एकत्र आणलं. मात्र सपा-काँग्रेस युतीला मतदारांनी नाकारलं आणि ३०० हून अधिक जागा जिंकत भाजपनं सत्तांतर घडवलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button