सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं. झाडांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना सावली देण्यासाठी ६ गाड्या भरून सिमेंट पत्रे पाठवले आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही मदत पोहचली आहे. आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ, कणकवली, सावंतवाडीमध्ये या गाड्या रवाना केल्या.
शिवसेना नेहमीच संकट काळात नागरिकांना मदतकार्य करत असते. त्यानुसार शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्तांसाठी ६ गाड्या भरून सिमेंट पत्रे पाठविले आहेत. वादळामुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्गवासियांना जास्तीत जास्त मदत देण्याचे काम येत्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं. तसंच त्यांनी एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले पत्रे घरांचं नुकसान झालेल्या सर्वांना दिले जाणार आहेत. संकटकाळी सर्वप्रथम शिवसेना पक्षच धावून येत असतो. या संकटातही हे सिद्ध झाले आहे. अशाच प्रकारे शिवसेना जनतेच्या संकटकाळात मदतकार्यासाठी तत्पर राहील असं संदेश पारकर म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात जाणार असून तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
वडेट्टीवार कोकणात
दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा उद्या 20 मे रोजी कोकण दौऱ्यावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. २० ते २३ मे पर्यंत ते कोकणातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. या तीन दिवसाच्या दौऱ्यात ते कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करतानाच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नुकसानीचा आढावाही घेणार आहेत.