
मुंबई : पनामा पेपर लीक प्रकरणात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालया (ईडी) नं अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला समन्स बजावले आहेत. त्यामुळे आता ऐश्वर्याला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर रहावं लागणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील ऐश्वर्याला याप्रकरणी दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही वेळा ऐश्वर्याने ही नोटीस स्थगित करण्याची मागणी केली होती. परंतु, आता पुन्हा तिसऱ्यांदा तिला चौकशीचे समन्स बजावण्यात आले आहेत.
पनामा येथील एका लॉ फर्मने गेल्या वर्षी काही गोपनीय कागदपत्रे लिक केली होती. यामध्ये जवळपास ४२४ भारतीय व्यक्तींचे विदेशी बँकांमध्ये खाते असल्याचं उघड झालं होतं. या खात्यांमध्ये या बड्या व्यक्तींनी त्यांचा काळा पैसा गुंतवला होता. यात राजकीय नेत्यांपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा समावेश होता. विशेष म्हणजे यात ऐश्वर्या रायसह अमिताभ बच्चन, अजय देवगण या कलाकारांच्या नावाचाही समावेश आहे.
ब्रिटनमध्ये २०१६ मध्ये पनामाचा लॉ फर्मच्या १.१५ कोटी टॅक्स डॉक्यूमेंट्स लीक झाले होते. यामध्ये जगभरातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी,मोठे राजकीय नेते आणि अन्य व्यक्तींची नावं समोर आली होती. या प्रकरणात भारतातील जवळपास ४२४ व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. यात अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्याही नावाचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या यादीत ज्यांचं नाव आहेत त्यांच्यावर टॅक्समध्ये गडबड केल्याचा आरोप करण्यात आलाय. टॅक्स अथॉरिटी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे .विशेष म्हणजे यात ऐश्वर्या रायला एका कंपनीचं अध्यक्ष करण्यात आलं आणि त्यानंतर याच कंपनीची शेअर होल्डर म्हणून घोषित केलं. दरम्यान, आता या प्रकरणात पुन्हा एकदा ऐश्वर्याला चौकशीचे समन्स बजावल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र,यावेळी ऐश्वर्याला चौकशीसाठी हजर रहावं लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.