राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. यावेळी तनपुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरं दिली आहेत. तसंच पुढे त्यांनी बोलावल्यास आपण चौकशीला जाऊ, असंही तनपुरे म्हणाले आहेत. दुपारी ३ वाजता ईडी कार्यालयात तनपुरे यांच्या चौकशीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.
मला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीने चौकशीला बोलावलेलं होतं. मात्र ईडीचे अधिकारी एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे तीन वाजल्यापासून चौकशीला सुरुवात झाली. मी ईडीला सविस्तर उत्तर दिलेली आहेत. मला जे जे प्रश्न विचारण्यात आले त्यांची मी त्यांना उत्तर दिलेली आहेत. जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही. काही तांत्रिक माहिती जी मी पाठ करु शकत नाही ती मला पुन्हा बोलावल्यास मी ईडीच्या अधिकाऱ्यांना देईन, असं तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे पंचवीस हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. नंतर हा गुन्हा ईडीने तपासासाठी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अनेक कारखान्यांना कर्ज दिलं आहे. त्या सहकारी साखर कारखान्यांनी ते कर्ज फेडले नाही. त्यामुळे बँकेने ते कारखाने जप्त केलेत. हे जप्त केलेले कारखाने बँकेवर संचालक असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनीच कवडीमोल भावात विकत घेतले. हा सर्व प्रकार सहकारी साखर कारखाना घोटाळा म्हणून ओळखला जात आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार आहेत.अहमदनगर जिल्ह्यात राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना होता. हा कारखाना तोट्यात निघाल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला. यानंतर २०१२ मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर करण्यात आला. हा लिलाव जाहीर झाला तेव्हा प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळावर होते. कारखान्याचा लिलाव जाहीर केला तेव्हा कारखान्याची विक्री किंमत २६ कोटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड या कंपनीने तो केवळ १३ कोटी रुपयांना विकत घेतला. हाच व्यवहार ईडीला संशयास्पद वाटत आहे. त्या अनुषंगाने तनपुरे यांची चौकशी आज करण्यात आली.