Top Newsराजकारण

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मुळे दिल्ली सीमेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी

नवी दिल्ली: संयुक्त किसान मोर्चाने नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आज पुकारलेल्या भारत बंदने सकाळपासूनच आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. सोमवारी आठवड्याच्या आणि कामाच्या पहिल्या दिवशीच दिल्ली-गुरुग्राम सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे.

हायवेवर शेकडो गाड्यांची लांबच-लाब रांग आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सकाळपासून हा मार्ग बंद केला आहे. तर, तिकडे गाझीपूर सीमेवरही शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे बंद केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४ आणि ९ दोन्ही ब्लॉक करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी ट्वीट करुन या जामबद्दल सतर्क केलं आहे. यूपी ते गाझीपूरपर्यंतची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भारत बंदमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. दिल्ली-गुरुग्राम सीमेवर सकाळपासून झालेल्या ट्रॅफिक जाममुळे कार्यालयात जाणारे लोक वाटेतच अडकले आहेत. केएमपी एक्सप्रेस वेवर शेतकरी बसले आहेत. यामुळे पोलिसांनी एक्स्प्रेस वे बंद केला आहे. याशिवाय लाल किल्ल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत.

तिकडे, हरियाणाच्या कुरुक्षेत्रातील शहाबाद परिसरातही आंदोलक शेतकरी संतप्त झाले. शेतकर्‍यांनी रस्त्याच्या मधोमध गाद्या टाकून त्यावर झोपून रस्ता अडवला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गही बंद झालाय. शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे या मार्गावर ट्रकच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, गाझियाबाद आणि नोएडा पोलिसांनी आधीच वाहतूक वळवण्याचा मार्ग जारी केला आहे.

आम्ही पुढील १० वर्षे आंदोलन करण्यास तयार : राकेश टिकैत

दरम्यान, आम्ही पुढील दहा वर्षेही आंदोलन करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रियी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

टिकैत म्हणाले की, केंद्रीय कृषी मंत्री चर्चेसाठी येण्याचे आमंत्रण देत आहे. पण, आम्हाला कृषीमंत्र्यांना विचारायचे आहे की, सरकारने आम्हाला वेळ आणि ठिकाण सांगावं. पण, केंद्र सरकार तसं करणार नाहीत. ते फक्त बोलतात पण करत काहीच नाहीत. सरकारने आम्हाला बिनशर्त चर्चेसाठी बोलवावे. 10 वर्षे लागली तरी आम्ही तयार आहोत, पण आम्ही आमच्या मागण्या मागे घेणार नाहीत. तसेच, बंद दरम्यान रुग्णवाहिका, डॉक्टर आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित इतर लोकांना थांबवले जाणार नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.

भारत बंदमध्ये शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेस रोखली आहे. दिल्ली आणि यूपीमधील गाझीपूर सीमादेखील बंद करण्यात आली आहे. गाझियाबाद पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीसंदर्भात अ‍ॅडवायजरी जारी केली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पंडित राम शर्मा स्टेशनवर प्रवेश बंद केलाय. हरियाणातील बहादूरगडमध्ये शेतकरी रेल्वे ट्रॅकवर बसले आहेत. यामुळे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button