आरोग्य

डॉ. रेड्डी यांना ‘अर्न्स्ट अँड यंग’तर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : आधुनिक भारतीय आरोग्यसेवेचे रचनाकार म्हणून ओळखले जाणारे, अपोलो हॉस्पिटल्स समुहाचे दूरदर्शी संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांना आज ‘अर्न्स्ट अँड यंग’ या संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘ई-वाय आंत्रप्र्युनर ऑफ द ईयर (ईओवाय) २०२०’ या व्हर्च्युअल स्वरुपात झालेल्या समारंभात डॉ. रेड्डी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समाजाचे भवितव्य सुधारण्याचे कार्य अविरतपणे करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येत असतो. रुग्णालयांमध्ये गुणवत्तापूर्ण उपचार मिळण्याची वानवा असल्याच्या काळात डॉ. रेड्डी यांनी जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याची दूरदृष्टी दाखविली, याचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला. उद्योजकतेचा पूर्वानुभव नसतानाही ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला अतिशय कठीण व्यावसायिक वातावरणात त्यांनी अपोलो हॉस्पिटल सुरू केले आणि प्रचंड प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत हे हॉस्पिटल टिकवून ठेवीत भारतातील सर्वात मोठी एकात्मिक आरोग्यसेवा उभी केली, याचे यथार्थ वर्णन या पुरस्काराच्या रुपाने होत आहे. विकसनशील देशांमध्ये भारतात आज खासगी क्षेत्राच्या नेतृत्वामध्ये सर्वात प्रगत आणि परवडणारी आरोग्यसेवा उभी राहिली आहे, हा वास्तवातील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यात डॉ. रेड्डी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तिचाच सन्मान या पुरस्काराने करण्यात आला आहे.

अपोलो हॉस्पिटल्स समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी या प्रसंगी म्हणाले, “अर्न्स्ट अँड यंग’ कडून मला जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने मी विनम्र झालो आहे. मला हा पुरस्कार माझ्या संपूर्ण अपोलो हॉस्पिटल्स परिवाराला समर्पित करायचा आहे. या परिवारातील सर्व सदस्यांच्या अखंडित प्रयत्नांशिवाय चेन्नईतील पहिल्या रुग्णालयाचे दरवाजे ३८ वर्षापूर्वी सामान्य रूग्णांसाठी उघडले जाणे शक्य झाले नसते आणि आज आशियातील सर्वात मोठा, सर्वात विश्वासार्ह आरोग्यसेवा समूह उभा राहिला नसता. मला आनंद वाटतो की देशात आरोग्यसेवा क्रांतीचे बीज पेरण्याची व ती जोपासण्याची संधी नशिबाने मला दिली. केवळ अपोलो हॉस्पिटल्स नव्हे, तर देशातील अनेक खासगी आरोग्य संस्था जगात सर्वोत्कृष्ट ठरणारी आरोग्यसेवा देत आहेत, हे पाहणे आज माझ्यासाठी खरोखर अभिमानास्पद आहे.”

पद्मभूषण व पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित झालेले डॉ. प्रताप सी.रेड्डी यांनी १९८३ मध्ये चेन्नई येथे पहिले १५० खाटांचे खासगी रुग्णालय उभे करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. एका तरूण रुग्णाला हृद्यविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला जाणे परवडत नसल्याने जीव गमवावा लागला. याची खंत ही त्यांच्या या रुग्णालय उभारणीला चालना देणारी ठरली. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा न मिळाल्याने अन्य कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचा संकल्प त्यांनी केला. अपोलो हॉस्पिटल्स समूह निर्माण झाला, ही त्या संकल्पाचीच फळे आहेत. उच्च दर्जाची प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध असणे ही देशाची वाढती गरज आहे. अशा वेळी रुग्णांना प्रगत उपचारांसाठी परदेशांमध्ये जावे लागू नये, म्हणून अपोलो हॉस्पिटल्स समुहाने देशभरात ७१ रुग्णालये, त्यांतील १०,२६१ बेड्स, औषधविक्रीची दुकाने, नैदानिक प्रयोगशाळा आणि किरकोळ आरोग्य केंद्रे असा विस्तृत कारभार उभारला आहे. या समुहाने डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ‘अपोलो 24/7 अॅप’, ‘व्हर्च्युअल कन्सल्टिंग’ या सुविधा सुरू केल्या आहेत. तसेच ‘अपोलो प्रोहेल्थ’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा व स्वास्थ्य या सेवा सादर केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button