महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी माफी मागावी; नाना पटोले आक्रमक

मुंबई : वर्षभरापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या स्थितीत राज्य सरकारनं सातत्याने केंद्राकडे लस आणि आर्थिक मदत मागितली जात आहे. मात्र, काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर आरोप केला त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलाय. कोरोना आपत्ती निवारणाची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. तरीही केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.
कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन आता महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये जोरदार वाद रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याचं काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकावर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता पटोले यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे. राज्यात सध्या रक्ताचा साठाही कमी आहे. आम्ही राज्यभर रक्तदान शिबिरे घेत आहोत. 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करणार आहोत. कोरोनामुक्त बुथ असं अभियानही हाती घेत आहोत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात कोरोना वॉर रुम सुरु करत आहोत. काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात कोरोना हेल्पलाईन सुरु करतोय. मदत आणि पुनर्वसन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन्ही मंत्र्यांना आम्ही याची जबाबदारी देत असल्याची माहिती पटोले यांनी दिलीय.