मुंबई : मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील एसटी कामगारांचा संप आज संपणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, आंदोलनाचे नेतृत्व आपल्या हातात घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गुरुवारी दिला आहे. यानंतर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कठोर भूमिका घेतल्याचा पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ केली. पण, अॅड. सदावर्ते यांनी विलिनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधाना अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. ‘दोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा स्पष्ट इशारा परब यांनी दिला. परब म्हणाले की, राज्य सरकारने आपली भूमिका कालच स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. मागन्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते, पण काही कारणास्तव ते येत नाहीयेत. आम्ही आता उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ. जे कर्मचारी संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
परब पुढे म्हणाले की, आम्ही पगारवाढीची मागणी मान्य केली आहे. त्यांच्या इतरही काही मागण्या असतील तर त्यांनी समितीसमोर मांडव्यात. विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालय जो निर्णय देईन, तो आम्हाला मान्य असणार आहे. आता कर्मचाऱ्यांनी संप करुन जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विलीनीकरण होईपर्यंत संप सुरूच : सदावर्ते
जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी कामावर जाणार नाही, असे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे. आज राज्य सरकारने तुटपुंजी वेतनवाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची नाही, तर विलीनीकरणाची मागणी केली होती. वेतनवाढ दिली तरी संप मागे घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण केले आहे. या बोटावरील थुंकी त्या बोटावर केली आहे. भावाभावांत भांडण लावणारे तुम्ही शरद पवार आहात. तुम्ही आमच्यात फूट पाडली आहे, जो निर्णय झाला ती एक फसवणूक आहे, असं सदावर्ते म्हणाले.
पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार प्रहार
मी एक रुपयाही कोणाकडून घेतला नाही, मी संघटना म्हणून नाही. सदाभाऊ तुम्ही पाया पडलेले व्हिडिओ माझ्याकडे आहेत, ती रेकॉर्डींग जर मी सांगितली. तुम्ही म्हणालात, दोन लेकरांची शपथ घेतो. पण, सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर तुम्ही माझ्या घरी दोनदा आला होतात. विश्वास नांगरे पाटलांची भीती वाटत होती म्हणून आलात. हे पराभूत मानसिकतेतून काहीही बोललं जात आहे, असे सदावर्ते म्हणाले.
माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत, माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डींग आहे, सदाभाऊ तुम्ही वयोवृद्ध आहेत, म्हणून बोलत नाही. पण, १० किमीवरील ओबीसींसाठीची शाळा, सांगू काय लोकांना, शाळेवर हे प्रकरण सदाभाऊंना घेऊन गेलं हे मी डंके की चोटवर सांगतो, असे म्हणत सदावर्तेंनी पडळकर आणि खोत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांचं हे तोडो पॉलिटीक्स आहे, कामगार मध्येच बैठकीतून निघून गेले होते. पण, या दोघांनी… असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.
माझी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही काल चर्चा झाली होती, आज खोत आणि पडळकर गेले नाहीत. तर, आम्हीच त्यांना आझाद मैदानातून आझाद केलंय, असेही सदावर्तेंनी म्हटलं. मी ओबीसींची शाळा कधी घेतली नाही, मी सर्वाधिक क्लाएंट असलेला वकील आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना माहितीय, मी इकडून तिकडे उड्या मारणार नाही. त्यामुळे, मी नॉन पॉलिटीकल माणूस आहे. त्यामुळेच, बड्या नेत्यांविरुद्ध बोलू शकतो, असेही सदावर्तेंनी म्हटलं.
संपातून खोत-पडळकरांची माघार
एसटी कामगारांचं आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आता पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असंही खोत यांनी म्हटलं. यावेळी गोपीचंद पडळकरदेखील त्यांच्यासोबत होते. यावेळी त्या दोघांनीही आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उतरलो होतो असं सदाभाऊ खोत म्हणाले.