राजकारण

कोणाच्याही आमिषाला, चिथावणीला बळी पडून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका !

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन; भाजपला टोला

मुंबई : राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

कोविडविषयक नियमांचे पालन न केल्याने, तसेच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत. कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा. राज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button