भारताला धक्का; मेहुल चोक्सीला डॉमिनिकामधील कोर्टाकडून जामीन
रोस्से (डॉमिनिका) : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताला डॉमिनिकामधील हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. भारतातून पळून गेलेला आणि सध्या डॉमिनिकामध्ये अटकेत असलेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याला डॉमिनिकामधील न्यायालयाने जामीन दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव उपचार करण्यासाठी अँटिग्वा येथे जाण्याची परवानगी मेहुल चोक्सी याला देण्यात आली आहे. कोर्टाने याबाबत एक संयुक्त सहमती आदेश दिला आहे.
कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मेहुल चोक्सी झूमच्या माध्यमातून रुग्णालयाच्या बेडवरून उपस्थित झाला. चोक्सीच्या कायदेशीर पथकाचे नेतृत्व त्रिनिदादचे वरिष्ठ वकील डग्लस मेंडेस करत आहेत. अन्य वकिलांमध्ये जेना मूर डायर, जुलियन प्रीवोस्ट, जीना डायर मुनरो, वेन नोर्डे आणि कारा शिलिंगफोर्ड मार्श यांचा समावेश आहे. मेहुल चोक्सीला दिलासा देताना कोर्टाने सांगितले की, त्याला डॉमिनिकामध्ये अवैध प्रवेश करण्याच्या प्रकरणात सुनावणीसाठी परत यावे लागेल. वैद्यकीय चौकशीसाठी चोक्सीला कोर्टाने अँटिग्वामध्ये जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये मेहुल चोक्सीच्या प्रकरणात डॉमिनिकाच्या कोर्टामध्ये सुनावणी झाली होती. त्यावेळीसुद्धा आरोग्याचे कारण देऊन चोक्शीन कोर्टात उपस्थित राहिला नव्हता. मागच्या सुनावणीवेळीसुद्धा तो रुग्णालयातूनच हजर झाला होता. चोक्सीवर पीएलबीला १३ हजार ५०० कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता विचारात घेऊन अँटिग्वामध्ये फरार झाला होता. मात्र मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्या तो डॉमिनिका येथे पोहोचला होता. तिथे पोलिसांनी त्याला अटक केली होती.