
मुंबई : मुख्यमंत्री पद हे महत्त्वाचं पद आहे. त्यापदावरील व्यक्तीबद्दल बोलताना संयम बाळगणं आवश्यक आहे हे आमचं मत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विसरतात. त्यामुळे कुणाच्या मनात संताप तयार होऊ शकतो. नारायण राणेंवर सरकार ज्याप्रकारे कारवाई करतंय त्याचे समर्थन बिल्कुल करता येत नाही. भारतीय जनता पार्टी राणे साहेबांच्या त्या वक्तव्याशी मागे नसेल. परंतु नारायण राणे यांच्या पाठिशी भाजपा उभा राहील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, शरगील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. कायद्याच्या भाषेत नारायण राणेंनी कुठलाही गुन्हा केला नाही. पण त्याचं गुन्ह्यात जबरदस्ती रुपांतर करायचं? पोलीस आयुक्तांच्या पत्रात मुसक्या बांधा, हजर करा ते स्वत:ला समजतात काय? नारायण राणेंची बाजू ऐकून न घेता कलमं कशी लावली? पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांबद्दल नितांत आदर आहे. निष्पक्ष पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ख्याती आहे. सरकारपुढे काहीजण लोटांगण घालत आहे. केवळ सरकारला खुश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करायला लागलं तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही असं त्यांनी सांगितले.
ठाकरे सरकार हे पोलिसजीवी झालंय. कोर्टाने चपराक दिल्यानंतर बदला घेण्यासाठी पोलिसांचा वापर सरकारकडून करायचं हे योग्य नाही. मी धमकी देत नाही सल्ला देतो. पोलिसांनी कायद्याने काम करावं. बेकायदेशीर काम करणारे पोलीस कुठे आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. तीन पथकं नारायण राणेंना पकडण्यासाठी जातात. नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन नाही परंतु बेकायदेशीरपणे सरकार पोलिसांचा गैरवापर करतंय. त्यामुळे नारायण राणे यांच्या पाठिशी भाजपा ठाम उभी राहणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपा कार्यालयावर हल्ला केला तर सहन करणार नाही
आम्ही राडा करत नाही, हिंसाचार करत नाही परंतु आमच्या कार्यालयावर हल्ला झाले तर आम्ही रस्त्यावर येऊन लढणारे लोकं आहोत. कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना अटक केली नाही तर दोन्ही विरोधी पक्षनेते संबंधित पोलीस ठाण्यासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करु, इथं तालिबानी राज्य नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
त्यांची ती ‘ठाकरी भाषा’, दुसरं कुणी बोललं तर गुन्हा… हा दुटप्पीपणा!
तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता, लाथा घाला म्हणता, चौकीदार चोर आहे म्हणता त्यावर गुन्हे दाखल का होत नाही? ही दुटप्पी भूमिका योग्य नाही. तुम्ही आमच्यावर किती वैयक्तिक टीका करता आम्ही सक्षम आहोत. परंतु भूमिका एकच असली पाहिजे दुटप्पी नको. मुख्यमंत्री काय बोलले तर त्यांची ती ठाकरी भाषा अन् दुसरं कुणी बोललं तर गुन्हा असं होऊ शकत नाही. जी काय कारवाई चालली आहे. ती योग्य नाही अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
अवैधपणे नारायण राणेंना पोलिसांना अटक केली तरी जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन पुढे सुरू ठेऊ. आमची यात्रा तुम्ही रोखू शकत नाही. पोलिसांच्या बळावर भाजपाला रोखण्याचा प्रयत्न ५० वर्ष झाला परंतु भाजपा थांबली नाही. लोकशाहीत अशाप्रकारच्या गोष्टी योग्य नाहीत असंही फडणवीस म्हणाले आहेत.