महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, पोलीस महासंचालक सुट्टीवर; संतप्त शिवसेनेची कारवाईची मागणी

मुंबई : महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलीस महासंचालक संजय पांडे राज्याबाहेर सुट्टीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय पांडे परवानगी न घेताच चंदिगढला सुट्टीवर गेल्याची माहिती आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज असून कारवाईची मागणी केली जात आहे. याआधीही संजय पांडे आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.
महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणारे संजय पांडे विनापरवानगी चंदिगढला गेलेच कसे? असा सवाल विचारला जात आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज आहे. संजय पांडे यांच्यावर तातडीनं कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केल्याची माहिती आहे.
संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही, असंही त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.