राजकारण

कठोर निर्बंधांमुळे अस्वस्थता, सामान्यांना दिलासा द्या!

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – राज्य सरकारच्या कडक निर्बंध नियमावलीच्या अंमलबजावणीवेळी मोठा गोंधळ उडाला. विकेंड लॉकडाऊन सांगत राज्य सरकारने आणि तत्सम जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने उघडण्यास बंदी घातली होती. त्यामुळे, व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर उभे राहून सरकारच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवला. तसेच, विकेंड लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, पण 30 एप्रिलपर्यंत दुकानेच उघडायची नाहीत, याला आमचा विरोध असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवीन नियमावली जारी करण्याची मागणी केली आहे.

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावी. तसेच, सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊन असल्याचे समजून आम्ही सहमती दर्शवली होती. मात्र, इतरही 5 दिवस लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीचे कडक निर्बंध असल्याने जनमानसात कमालीची अस्वस्था आहे. त्यामुळे या निर्बंधाची नव्याने अधिसूचना जारी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

दोन आदेशांमुळे गोंधळ निर्माण

दरम्यान, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या दोन वेगवेगळ्या परिपत्रकांमुळे गोंधळ निर्माण झाला असल्याचे दिसते आहे. राज्य सरकारने किराणा औषधे वगैरे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद म्हटले आहे. त्यावेळी, केवळ 2 दिवसांचा विकेंड लॉकडाऊन असेल, असा समज सर्वांचाच झाला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने आदेश काढल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशासन आक्रमक झाले असून कठोर पावले उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार व जिल्हा प्रशासन यांच्याद्वारे जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली आहे. याचाच निषेध म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात व्यापारी संघटनांनी रस्त्यावर उतरुन प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे. पंढरपूर येथील व्यपाऱ्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता, तसेच यासंदर्भात आपण सरकारकडे भूमिका मांडावी, अशी विनंतीही केली होती. त्यानंतर, फडणवीस यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना नियमावलीचा पुनर्विचार करण्याचे सूचवले आहे.

पुण्यातही व्यापाऱ्यांनी निषेध नोंदवला

पुण्यात मंगळवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावर अनेक व्यापारी राज्य सरकार व प्रशासनाच्या निषेध व्यक्त करणाऱ्या फलकांसह रस्त्यावर घोषणाबाजी केली. यावेळी अनेक व्यापारी वर्गाने गर्दी करत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणीही केली आहे. याबाबत लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटनेचे प्रशांत टिकार म्हणाले,प्रशासनाचा हा निर्णय सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा आहे.आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापारी वर्गाला या निर्णयामुळे खूप मोठा फटका बसणार आहे.सरकार व प्रशासनाने आमच्या भावनांचा व परिस्थितीचा विचार करावा. आम्हाला दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button