राजकारण

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत वजन वापरावे; भुजबळांचा उपरोधिक टोला

नाशिक : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उशिरा का होईना, नाशिकला येऊन गेले. त्यांनी नाशिक दत्तक घेतले आहे, त्यामुळे नाशिकचे दत्तक पिता या नात्याने मी त्यांचे आभार मानतो. फडणवीसांचे दिल्लीत वजन आहे. त्यांनी आपले वजन वापरून केंद्राकडे थकीत असलेले महाराष्ट्राचे ४० हजार कोटी रुपये तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, असा उपरोधिक टोला लगावत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस यांच्या नाशिक दौ-याबाबत बोलताना ते म्हणाले, फडणवीस हे नाशिकचे दत्तक पिता आहेत. नाशिककरांनी त्यांना महापालिकेची सत्ता दिली; परंतु अन्य महत्त्वाच्या कामांमुळे ते नाशिकला येऊ शकले नाहीत. आज त्यांनी वेळात वेळ काढून नाशिकला हजेरी लावली. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. त्यांचे आणि राज्यातील अन्य काही भाजप नेत्यांचे दिल्लीत चांगले वजन आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन बसावे. जीएसटीचे ४० हजार कोटी, करोनावरील औषधे, मुबलक आँक्सिजन राज्यासाठी मंजूर करून आणावा. आम्हाला सर्वांच्या मदतीची गरज असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले. लस पुण्यात बनत असली, तरी ती वाटपाचे नियंत्रण केंद्राकडे आहे. राज्याच्या वाट्याला जेवढ्या लस मिळत आहेत, त्या वेगाने दिल्या जात असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. राज्यासाठी अधिक लसींची तरतूद व्हायला हवी अशी अपेक्षाही व्यक्त केली.

नाशिकमध्ये आँक्सिजनचा तुटवडा भासतोय मंजूर कोट्याच्या निम्माही पुरवठा होत नाही, हेही खरेय याबाबत मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा मांडला; परंतु आँक्सिजन असेल किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणाचे अधिकार केंद्राने आपल्याकडे घेतल्याने केवळ कागदावर कोटा मंजूर केला जातो; परंतु प्रत्यक्षात पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणाच्या बाबतही तीच परिस्थिती आहे. राज्याला ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी साडेतीन कोटी लस आवश्यक असताना १ कोटी लस देण्यात आल्या. या गतीने पुरवठा होत राहिला, तर क्षमता असूनही लसीकरणाचा वेग वाढवणार कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button