फडणवीस यांचा लॉकडाऊनला विरोध; कोरोना चाचण्या वाढवण्याची मागणी

मुंबई : राज्यात लॉकडाऊन नाही तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लॉकडाऊनला विरोध करत कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्यूला सांगितला आहे. फडणवीसांनी ट्विट करत ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ ही त्रिसूत्रीच कोरोनाला थोपवू शकते असं म्हटलंय. तसेच, चाचण्या वाढवणे हाच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. हे वारंवार सांगूनही न ऐकणार्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातोय की काय अशी शंका व्यक्त केली जातेय. या पार्शवभूमीवर ते म्हणाले की, राज्यात लॉकडाऊन नाही तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसरऱ्या लाटेची वाट पहावी लागली. येणार्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवायला हवी. राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. आता तरी हे सूत्र कायम ठेवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.