गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा : देवेंद्र फडणवीस

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देणं ही राजकीय मागणी राहिली नाही, देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं. त्यातून सर्व सत्यबाहेर येईल. ते निर्दोष असतील तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं. त्याला आमचा विरोध असणार नाही. परंतु, तूर्तास चौकशी होईपर्यंत तरी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण आता हे प्रकरण राजकीय राहिले नसून ते सीबीआयकडे गेलं आहे, असंही ते म्हणाले.
उच्च न्यायालयाने देशमुख प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. या आदेशामुळे आता हप्तेवसुलीचा पर्दाफाश होईल. राज्याला काळीमा फासणारा हा जो कारभार मधल्या काळात झाला. त्याचं सत्य सीबीआय चौकशीतून समोर येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केला होता. त्याला कोर्टाने जोरदार उत्तर दिलं आहे. कोर्टाने हप्ते वसुलीविरोधात कडक पाऊल उचललं आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो, असं सांगतानाच पोलीस गृहमंत्र्यांची चौकशी करूच शकत नाही. कारण पोलिसांवर दबाव असल्याचं दिसून येत होतं, असंही ते म्हणाले.