एमपीएससी विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

मुंबई: महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट आता आणखी गडद होत चाललं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (एमपीएससी ) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं 11 एप्रिलला होईल, असं जाहीर केलेय. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णंसख्येची धास्ती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी घेतली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा घ्यावी म्हणून गेल्या महिन्यात रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय आहे? विद्यार्थी परीक्षा ढकलण्याची मागणी का करत आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नेमकी भूमिका काय? मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाचं कारण देत 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी विरोध केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं 14 मार्चची परीक्षा 21 मार्चला घेण्याचे आणि त्यासोबतचं 11 एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं होईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केले. आता राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढल्यानं विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलीय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसलेले काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. काही विद्यार्थ्यांचे पालक देखील पॉझिटिव्ह आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांसमोर परीक्षेला उपस्थित राहण्याविषयीची अडचण आहे. गेल्या आठवड्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश आणि बिहार सरकारनं लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्याचा संदर्भ दिला आहे.