भाजप-शिवसेनेच्या छुप्या युतीमुळे बोदवड नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा पराभव; खडसेंचा आरोप
जळगाव: अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी, या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची छुपी युती होती, असा आरोप केला आहे.
शिवसेनेचा झालेला मोठा विजय राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आपल्याच बालेकिल्ल्यात जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.
एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजप आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगले यश मिळाले आहे. ईश्वचिठ्ठीमुळे दुर्दैवाने गेलो अन्यथा बहुमतापर्यंत आलो असतो. पण हा पराभव का झाला याचे चिंतन करण्याची गरज असून आम्ही ते करु, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.