
लखनऊ: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ४० टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले जाईल. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी लखनऊमधील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रियंका गांधी यांनी यासोबतच महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, पक्षाने यूपीतील शोषित महिलांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. ‘मी एक मुलगी आहे, मी लढू शकते’ हा काँग्रेसचा नारा आहे. आपल्याला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावेच लागेल. महिलांना गुणवत्तेच्या आधारावर तिकीट दिले जाईल. याची सुरुवात ४० टक्क्यांपासून होत आहे. आगामी काळात ५० टक्के महिलांना तिकिटे दिली जाईल. इच्छुक असलेल्या कोणत्याही महिला त्यांच्या विधानसभेतून फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात. काँग्रेस त्यांना निवडणूक लढवण्यास मदत करेल, असं प्रियंका म्हणाल्या.
यावेळी प्रियंका गांधी यांनी केंद्र आणि योगी सरकारवरही निशाणा साधला. आज सत्तेच्या नावाखाली तुम्ही जनतेला खुलेआम चिरडू शकता, तुमच्यात खूप द्वेष भरला आहे. पण, महिला हे बदलू शकतात. तुम्ही राजकारणात माझ्या खांद्याला खांदा लावून सामील व्हा. देशाला धर्माच्या राजकारणातून बाहेर पडून पुढे नेले पाहिजे. महिलांना हे काम स्वतः करावे लागेल, असंही त्या म्हणाल्या.
महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय क्रांतीकारी : नाना पटोले
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांची घोषणा ही महिलांना समान संधी व सन्मान देण्यासाठी टाकलेले क्रांतीकारी पाऊल आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या ऐतिहासीक निर्णयाचे स्वागत करत आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
यासंदर्भात पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्व समाज घटकांना न्याय देणारा पक्ष आहे. महिलांना समान संधी देण्यासाठी काँग्रेस पक्षाने यापूर्वीही अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्याची यशस्वीपणे अंमलबजावणीही केलेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यातही महिलांना सहभागी करून घेतले होते. दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध करुन दिली. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने हेच आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत केले. संरक्षण दलात महिलांना संधी देण्याचा निर्णयही राजीवजी यांनीच घेतला. महिला व मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा निर्णयही काँग्रेसच्या सरकारनेच घेतला आहे.
देशाला पहिल्या महिला पंतप्रधानपदाचा मान इंदिराजी गांधी यांच्या रुपाने काँग्रेसने दिला तसेच पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने देऊन जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस पक्षाने महिलांना राजकारणात आणखी महत्वाची संधी देण्याचे पाऊल उचचले आहे, या निर्णयाबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांचे आभारही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी मानले.