महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टी यांची काशी झाली !; सदाभाऊ खोतांचा टोला

नांदेड : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. तर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि शेट्टी यांचे जुने सहकारी सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना जोरदार टोला लगावलाय. महाविकास आघाडीसोबत जाऊन काशी झाली म्हणून त्यांनी आता आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, अशा शब्दात खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधलाय.
त्यांचा आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. मला वाटतं की त्यांचा भ्रमनिरास तेव्हा लगेच झालेला होता, कारण सदाभाऊ खोत मंत्री असल्यामुळं. मग आता भ्रमनिरास झाला की नाही? झाला असला तर आता त्यांनी आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, जेणेकरून मी यांच्याकडे जाऊन माझी काशी झाली म्हणून मी आता काशीला अंघोळ करायला आलोय, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावलाय.




