सावंतवाडी : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यांनी केली होती. बाळासाहेब जीवंत असताना त्रास द्यायचा आणि ते गेल्यावर नाटकं करायची याला माझा विरोध आहे, असा हल्लबोल दीपक केसरकर यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, राणे आपल्या मंत्रिपदाचा उपयोग समाजात अशांती आणि विध्वंस पसरवण्यासाठी करत आहेत. सामाजिक अशांतता निर्माण करायची भूमिका हे योग्य आहे का याचा विचार त्यांनी तर केलाच पाहिजे, परंतु महाराष्ट्राच्या जनतेनेदेखील केला पाहिजे, असेही केसरकर म्हणाले
केसरकर म्हणाले, त्यांनी नितीमत्तेच्या गोष्टी करू नये. नितीमत्ता काय असते हे मला माहिती आहे. बाळासाहेब जीवंत असताना त्यांना त्रास द्यायचा आणि ते गेल्यावर हे सगळे नाटकं करायची याला माझा विरोध आहे. आपल्या मंत्र्यांचे स्वागत करणं ही संस्कृती आहे. मात्र विद्वेष पसरवायचा आणि आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करायचा असं वर्तन सध्या राणेंचं आहे. मोदीजींनी मंत्रिमंडळात संधी दिली, मंत्रिपद दिलं ते लोकांच्या सेवेसाठी, त्यांच्या विकासासाठी मात्र ते न करता राणे सामाजिक अशांतता निर्माण करतायत. मात्र तुम्ही जेव्हा स्वतःच्या मातृभूमीमध्ये येता तेव्हा लोकांसाठी काय देता हे महत्त्वाचं असतं. तुम्ही फक्त विद्वेषाचं बाळकडू पुढच्या पिढीला देणार आहे का? आणि कोकणी संस्कृती नष्ट करणार आहात का?, असा सवालही केसरकरांनी राणेंना विचारला.
राणेंच्या मुलांना अजिबात भीक घालत नाही
राणेंच्या मुलाने मला धमक्या दिल्या. या धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही. कारण मी महाराष्ट्राचा एकमेव आमदार आहे ज्याच्या प्रॉपर्टी कमी झाल्यात. राजकारणासाठी मी माझ्या प्रॉपर्टी विकतो, कर्ज घेतो, ते कर्ज फेडतो, पण माझी नैतिकता कधी ढासळली नाही. ही नैतिकता असल्यानंच मी लढे देऊ शकतो. माझा लढा कोकणाचा विकासासाठी आहे, असं केसरकर म्हणाले
केसरकर म्हणाले, एका मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडल्याचे आदेश दिल्याचं काही लोक म्हणतात. मात्र, एका गरीब व्यक्तीला या जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मरेपर्यंत मारलं. यानंतर तो व्यक्ती पेटून उठला. त्याने या नेत्याची सर्व प्रकरणं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली. त्यानंतर या मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश निघाले. गरीब माणूस काय करु शकतो हे अनेक लोकांना माहिती नसतं. मात्र, गरीब माणूस असलो म्हणून अशाप्रकारे मारला जाता कामा नये. ही महाराष्ट्राची भूमी आहे, इथं हे चालणार नाही.
मारहाण झालेल्या व्यक्तीला फ्लॅट देण्याचं आश्वासन देण्यात आलं. लाखो रुपयांची आश्वासनं देण्यात आली. मात्र, त्याने आपला संघर्ष सोडला नाही. या संघर्षासाठी न्यायालयाची दारं नेहमी उघडी असतात. हे करताना तत्वांपासून मागे जायचं नसतं. तत्व सोडली तर रिझल्ट मिळणार नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती हे करु शकतो मग राजकीय पक्ष हे का करु शकत नाही? असा सवाल केसरकर यांनी विचारला.
माझा राजकीय संघर्ष कधीही रक्तरंजित नव्हता. माझा संघर्ष मारामारीचा नव्हता. मी माझ्या मार्गाने गेलो, विरोधकांना मतपेटीतून हरवलं. मी जेव्हा माझी घोषणा केली तेव्हा मी शिवसेनेतही नव्हतो. मी राष्ट्रवादीत होतो आणि आमदार होतो. राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन त्या संघर्षात उतरलो, असंही केसरकर यांनी सांगितलं.
कुंडल्या आमच्याकडेही आहेत
राणे जे बोलतात ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. राणेंनी कुंडली वगैरे काढण्याची भाषा करु नये ते ज्योतिषाचं काम आहे. आमच्याकडेही कुंडल्या आहेत. पण हेच करत बसायचं का? लोकांना विकास महत्त्वाचा आहे, ही असली थेरं नको, असं केसरकर म्हणाले.
मोदी साहेबांनी तुम्हाला मंत्री केलं. ते नेहमी पॉझिटिव्ह कार्यक्रम देतात… लोकांच्या विकासाचे कार्यक्रम देतात… मग हे विकासाचे कार्यक्रम घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार की तुम्ही महाराष्ट्रात अशांती पसरवणार, कोकण पेटवणार याचा निर्णय झाला पाहिजे, असंही केसरकर म्हणाले.
मला राणेंवर टीका करायची नाही मात्र कोर्टाने दिलेल्या आदेशाचं त्यांनी पालन करावं आणि आणि कोकणात शांती कशी नांदेल, हे त्यांनी पाहावं, नाहीतर त्यांच्याविरोधात आम्हाला पुन्हा लढा उभारावा लागेल, असा इशाराही त्यांनी राणेंना दिला.