
कानपूर : कानपूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अजिंक्य आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरीकडे साऱ्यांच्या नजरा होत्या आणि या अनुभवी जोडीला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. पण, शुबमन गिल व पदार्पणवीर श्रेयस अय्यर यांनी दमदार खेळ केला. अष्टपैलू रवींद्र जडेजाही मस्त खेळला. भारतानं पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवले. विशेषतः तिसरे सत्र भारताच्याच नावावर राहिले. अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ८४ षटकानंतर थांबवण्यात आला. भारतानं पहिल्या दिवसाच्या खेळात ८४ षटकांत ४ बाद २५८ धावा केल्या आहेत. श्रेयस १३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ७५ धावांवर खेळतोय, तर रवींद्र जडेजानंही १०० चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावा केल्या आहेत. किवींच्या कायले जेमिन्सननं ३ विकेट्स घेतल्या.
लोकेश राहुलच्या गैरहजेरीत मयांक अग्रवाल व शुबमन गिल ही जोडी सलामीला आली. पण, ८व्या षटकात जेमिन्सननं टीम इंडियाला पहिला धक्का देताना मयांकला ( १३) झेलबाद केले. शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी १३३ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. शुबमननं अर्धशतक झळकावले, परंतु लंच ब्रेकनंतर तो बाद झाला. जेमिन्सननंच ही विकेट घेतली आणि शुबमनला ५२ धावांवर माघारी फिरावे लागले. पुजारा व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी कमाल करेल असे वाटत होते, परंतु टीम साऊदीनं मोठा धक्का दिला. पुजारा २६ धावांवर बाद झाला. अजिंक्य खांद्यावर जबाबदारी घेऊन मोठी खेळी करेल, असे वाटत असतानाच त्यानं विकेट फेकली.
जेमिन्सननं टाकलेल्या ५० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अजिंक्यसाठी अपील झाले, मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. परंतु डीआरएसनंतर तो नाबाद असल्याचे दिसले. पण, हा जीवदान मिळूनही काही उपयोग झाला नाही. अजिंक्य पुढच्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याला ३५ धावा करता आल्या. पदार्पणवीर श्रेयस अय्यर आणि अनुभवी रवींद्र जडेजा या जोडीनं किवी गोलंदाजांना दाद दिली नाही. या दोघांनी सुरेख भागीदारी करताना भारताची धावसंख्या दोनशेपार नेली. १९७० नंतर पदार्पणात ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५०+ धावांची खेळी करणारा श्रेयस हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. मोहम्मद अझरुद्दीन यानं १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध आणि २०२० मध्ये एस बद्रीनाथनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.