Top Newsफोकस

चेंबूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर

मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

या दुर्घटनेत अद्याप ६ ते ८ जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी वेगाने बचावकार्य सुरु आहे. मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

मुंबईत रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या पाच ते सहा तास तुफान पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळत आहे.

मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, धारावी, अंधेरी, कांदिवली, मिरारोड यांसह ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या सखल भागात पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक ही बंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button