रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’

नवी दिल्ली : बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात रजनीकांत (Rajinikanth) यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान पटकावले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली.
यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (dadasaheb phalke award) जाहीर करताना प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.’
रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक 1975 मध्ये वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी मिळाला. हा चित्रपट होता ‘अपूर्व रागंगल’ (Apoorva Raagangal). कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांना केवळ 15 मिनीटांची भूमिका मिळाली होती. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली. रावणाची व्यक्तिरेखा साकारायला त्यांना फार आवडायचे.
चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या रामा हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टिस करत असत. रजनीकांत असे एकमेव अभिनेते आहेत ज्यांचा सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला. अनेकजण त्यांची पूजा करत असले तरी ते स्वत: मात्र कमल हसन यांचे मोठे चाहते आहेत.
प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयात जातात. त्यांच्या प्रत्येक भेटीत ऋषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्यांना दिली जाते. 1978 साली आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर नेले. या चित्रपटाची इतकी चर्चा झाली की दिग्दर्शक एम. भास्कर यांनी रजनीकांत यांचे 35 फुटांचे पोस्टर चेन्नईमध्ये लावले होते.




