मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात उद्या (बुधवार) रात्री ८ पासून १४४ कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढील १५ दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी वाहतुकीत मोठा वेळ जात आहे. त्यासाठी लष्कराच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा हवाई मार्गाने करण्यात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे. इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठीही पंतप्रधानांना विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे वैद्यकीय सुविधेवर भार पडत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. सध्याची स्थिती नियंत्रणात आली नाही तर स्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे.
नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याचा क्षण आला आहे. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे.
बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल.
राज्य सरकार म्हणून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना पुढचा महिनाभर प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिले जातील. शिवभोजन थाळी १० रुपयांत सुरू केली होती. कोविड आल्यानंतर ती ५ रुपये केली. आत्तापर्यंत काही कोटी लोकांनी या थाळीचा लाभ घेतला आहे. आता शिवभोजन थाळी पुढचा एक महिना मोफत दिली जाईल. दिवसाला आपण २ लाख थाळ्या देत आहोत. गोरगरीबांसाठी हे शिवभोजन आपण मोफत देणार आहोत. लॉकडाऊननंतर रोजीरोटीचं काय, अशी विचारणा केली जाते. रोजीचं नुकसान होईल, पण रोटीची सोय आपण केली आहे.
महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये अर्थसहाय्य देत आहोत. यांची संख्या १२ लाखांपर्यंत आहे. नोंदणीकृत घरेलू कामगारांना निधी देत आहोत. अधिकृत फेरीवाल्यांना एका वेळचे प्रत्येकी १५०० रुपये आपण देणार आहोत. स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांची बँकांमध्ये खाती असल्यामुळे थेट खात्यांमध्ये पैसे जमा होतील. त्यांची संख्या ५ लाख आहे. १२ लाख परवानाधारक शेतकऱ्यांना १५०० रुपये एकवेळचे आपण देत आहोत. आदिवासी बांधवांना खावटी सहाय्य योजनेतून एका वेळचे २ हजार रुपये देत आहोत.
जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा उभी करण्यासाठी ३ हजार ३०० कोटी फक्त कोविडसाठी बाजूला काढून ठेवतो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना थेट स्थानिक पातळीवर निर्णय घेता यावा, यासाठी हे करण्यात आलं आहे. साधारणपणे एकूण ४०० कोटींच्या या योजना आपण या माध्यमातून करत आहोत.
हे सगळं मी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर ठेवलं आहे. कुठेही लपवाछपवी नाही. नाईलाजाने ही बंधनं टाकावी लागत आहेत. आरोग्यसुविधा तयार करण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ही बंधनं आपल्याला स्वीकारावी लागत आहेत. ही बंधनं मी एकतर्फी टाकलेली नाहीत. त्यामाग फक्त प्राण वाचावेत हाच हेतू आहे. हे अजिबात आनंददायी नाही. टीका करणारे कितीही असले, तरी त्याला न भुलता आपली जी बांधिलकी आहे, त्याला स्मरून हे निर्बंध तुमच्यावर लादत आहे. त्याचा न रागावता स्वीकार करा आणि कोविडला पराभूत करण्यासाठी कंबर कसून सहकार्य करा.
मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा :
– उद्या रात्रीपासून ‘ब्रेक द चैन’साठी राज्यात संचारबंदी
– ५ हजार ४०० कोटी रुपयांचा हा निधी आधार देण्यासाठी आणि औषधोपचार आणि सुविधा देण्यासाठी बाजूला काढून ठेवत आहोत.
– परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी १५०० रुपये देणार
– नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही पैशांची मदत करणार
– फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये देणार
– पेट्रोलपंप आणि कार्गोसेवा सुरू राहणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहणार, मात्र पार्सल सेवा सुरू राहणार
– गरिबांना पुढील महिनाभर मोफत शिवभोजन देणार
– राज्यातील जनतेला निर्बंधाच्या काळात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देणार, ७ कोटी लोकांना होणार लाभ
– अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
– सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार
– वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
– शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील
– बँका, आर्थिक संस्था, अधिस्वीकृती धारक पत्रकारांना येण्या-जाण्यास मुभा
– बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट
– रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार