महाड : दोन्ही राजे एकच आहे, यात काहीही वेगळेपण नाही, उदयनराजे यांची सुद्धा मी भेट घेणार आहे, असे खा. संभाजीराजे यांनी आज स्पष्ट केले. त्याचवेळी राजेंवर कुणी वैयक्तिक टीका केली तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल. राजेंवर टीका म्हणजे मराठा समाजावर टीका, मराठे आता शांत बसणार नाहीत, असा इशारा कोल्हापूर मराठा समन्वयकांनी दिला आहे.
रायगडावर राज्यभिषेक सोहळा आटोपल्यानंतर संभाजीराजे यांनी महाडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा संघटनेचे समन्वयक उपस्थितीत होते. सर्व मराठा संघटनांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला आहे. कोल्हापूरमध्ये सगळे समन्वयक सोबत जाणार आहेत. कोल्हापूरमधील आंदोलन यशस्वी करणार असून ३६ जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा संघटनांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पुणे-मुंबईत आंदोलन असणार आहे. दुसरी लाट कोरोनाची आली होती आता तिसरी लाट, मराठ्यांची असेल. आज संभाजीराजे नेतृत्व करताहेत. पण कुणाच्या तरी पोटात दुखत आहे. जर त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली तर प्रत्युत्तर दिलं जाईल. मराठे आता शांत बसणार नाहीत, असा इशारा विनोद साबळे यांनी दिला.
मी कुणालाही वेठीस धरलं नाही, आमचा कुणाच्या विरोधात लढा नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी आमची सोपी मागणी आहे. जस्टीस भोसले यांच्या मार्फत मागण्या केल्या होत्या. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राकडे फक्त महाविकास आघाडी मिळून जाता येणार नाही, तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही सोबत आलं पाहिजे, असे आवाहन संभाजीराजेंनी केले.