राजकारण

शिवसेना भवनसमोर हाणामारी : भाजपच्या ३०, तर शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपसह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भाजपच्या ३०, तर शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळाप्रकरणी शिवसेनेच्या चंदू झगड़े, राकेश देशमुख, अभय तमोरेंसह इतर ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १४३, १४७, १४९, ३९२, ३२४, ३२३, ३५४, ५०९ यांसह विविध कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे भाजपा युवा मोर्चाच्या तजिंदर सिंह तिवाना (आयोजक), अजित सिंह आणि इतर एकूण ३० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १८८, २६९, ५१ तसेच राष्ट्रीय आपात्कालीन कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास शिवाजी पार्क पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, शिवसेना भाजप कार्यकर्ता राडा प्रकरण लक्षात घेऊन पुढे काही अप्रिय घटना घडू नये, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शिवसेना भवन समोर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय भाजपा मुंबई कार्यालयाबाहेर ही पोलीस बल तैनात करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button