
नवी दिल्ली : भारताने नुकताच कोरोनाविरोधी लसीचा १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अशातच आज भारतीय बनावटीची कोवॅक्सिन या लसीला जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. आज जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीच्या आपत्कालीन वापराच्या सूचीवर तांत्रिक सल्लागार गटाची बैठक झाली. या गटाच्या बैठकीत कोवॅक्सिन लसीला आपत्कालीन वापराच्या सूचीमध्ये स्थान देण्यात आले, असं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. वर्षभरापूर्वीच भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांनी या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. तर दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने कोवॅक्सिन लसीच्या वापरास परवानगी दिली आहे.
कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिल्याने आता आंतरराष्ट्रीय प्रवासातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्यांनी कोवॅक्सिन लस घेतलेली असेल तर त्यांना संबंधित देशात गेल्यानंतर कॉरंटाईन नियमाचे पालन करावे लागते. मात्र आता WHO च्या मान्यतेमुळे ही अडचण दूर होणार आहे.
यापूर्वी झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत लशीचं अंतिम मूल्यांकन करणं आवश्यक असल्याचे म्हणत लस निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीला अतिरिक्त स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर या सर्व मुद्द्यांवर आज डब्ल्यूएचओच्या तांत्रिक सल्लागार गटाची बैठक आज पार पडली. या बैठकीत मोठ्या प्रतिक्षेनंतर भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन लसीला मान्यता देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत फायझर-बायोएनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना व सिनोफार्म यांच्या लशींना मान्यता दिली आहे.
इंडियन मेडिलक असोसिएशनच्या सहकार्याने हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन ही स्वदेशी लस विकसित केली. या लसीला आपत्कालीन वापराच्या यादीत समाविष्ठ करण्यासाठी कंपनीने एप्रिल महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता