Top Newsआरोग्य

मुंबईत दोन दिवस कोरोना लसीकरण बंद

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद ठेवली जाणार आहेत. मुंबई महापालिकेने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की १५ व १६ मे २०२१ रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असे ट्विट मुंबई महापालिकेने केले आहे.

कोरोना लसींचा तुटवडा

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दोन्ही लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तर काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहे. राज्याला कोरोना लसींचा लवकरात लवकर पुरवठा करावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप राज्यात कोरोना लसींचा पुरवठा योग्य त्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात ‘तौत्के’ नावाचे चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ दिनांक १५ व १६ मे २०२१ रोजी मुंबईच्या नजिक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे वेगवान वा-यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. अरबी समुद्रात ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत पालिकेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धोकादायक झाडांची छाटणी करणे, समुद्रकिना-याजवळील पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणा-या ठिकाणी उदंचन संचाची व्यवस्था करणे, मुख्य ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके साधनसामुग्रीसह तैनात ठेवणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवणे आणि या अनुषंगाने नागरिकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button