राजकारण

महाराष्ट्र सरकारलाच ‘कोरोना’; कडक निर्बंधावरुन भाजप नेत्याची बोचरी टीका

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. त्यामुळे सर्वसामान्यांचा लोकल प्रवास पुन्हा एकदा बंद करण्यात आला. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मर्यादित पातळीवर मुभा देण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढवल्यावर पुन्हा एकदा लोकल प्रवासबंदी करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीर रविवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन, भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे.

कोरोनाच्या काळात लोकल प्रवासास बंदी असल्यामुळे अनेक प्रवाशांकडून बोगस ओळखपत्र दाखवून प्रवास करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अद्यापही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. असे असतानाही अनेक जण बनावट पास वा ओळखपत्र दाखवून प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेली आहे. त्यांच्यावर रेल्वे प्रशासकडून पाळत ठेवण्यात येत असून रविवारी एका तरुणाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी विनातिकीट प्रवास करताना पकडलं होतं. या घटनेचा व्हिडिओ त्यानेच शेअर केला आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांची होणारे हाल, त्रास यावरुन भाजपाने राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे.

जनतेला वेठीस धरण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकारलाच कोरोना झाला आहे, त्यातूनच सामाजिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे, हे दुर्दैवी वास्तव आहे. गेल्या १५ महिन्यांपासून लोकांनी जगायचं कसं, याचं उत्तर महाराष्ट्र सरकार देत नाही. पण, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशी भीती महाराष्ट्र सरकार दाखवतंय, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं.

सरकारकडून धोरणशून्य कर्तृत्वावरच स्वत:ची पाठ थोपटून घेतली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण जे बोलतोय ती समाजातील अनेक तरुणांची भावना असून याचा उद्रेक होईल, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले. राज्यातील तरुणांसह सर्वच वर्गात सामाजिक आणीबाणीविरोधात असंतोष दिसतोय. राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध लादले असून ही सामाजिक आणीबाणीच आहे. कारण, आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळे रस्त्यावर उतरणाऱ्या जनतेला सामोरे जाण्याचं धाडस या सरकारमध्ये नाही, असेही उपाध्ये यांनी म्हटलंय.

क्यूआर कोड असलेल्यांनाच पास

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर क्युआर कोड येणार आहे. हा क्युआर कोड रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवल्यानंतरच सदर कर्मचाऱ्यांना पास मिळणार असून, तसा निर्णय व नियोजन राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अधिकारपत्र दाखवून एकात्मिक पास मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील एक पत्रही रेल्वेला दिल्याची माहिती मिळाली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार आणि रेल्वेकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button