कोरोनामुळे भारतीयांची आर्थिक गणिते बिघडली
मुंबई : कोरोनाने लोकांच्या बचतीवर हल्ला केला आहे. देशातील बचतीचा दर बर्यापैकी खाली आला आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाची बचत करण्याची गती आता मंदावली आहे. देशांतर्गत बचत दर आता कोविडपूर्व पातळीवर १०.४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत तो दर २१ टक्के होता, परंतु आता दुसऱ्या तिमाहीत तो जवळपास निम्म्या म्हणजे १०.४ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या एका लेखात ही माहिती देण्यात आली आहे.
या लेखात असे म्हटले आहे की, कोरोना संसर्गाचा फटका सर्व भारतीयांनी बसला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचा कर्जाचा बोझा वाढला आहे. ताज्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय घरांवरील कर्ज जीडीपीच्या ३७.१ टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. त्याच वेळी, कुटुंबाची बचत १०.०४ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. कोरोनामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, तर मोठ्या संख्येने पगाराची कपात झाली आहे. यामुळे लोकांना अधिक कर्ज घ्यावं लागलं आहे किंवा त्यांनी हे खर्च त्यांच्या बचतीतून पूर्ण केले आहेत. आकडेवारीनुसार, एकूण कर्जबाजारामध्ये कुटुंबाचा वाटा वार्षिक आधारावर १.३० टक्क्यांनी वाढून ५१.५ टक्के झाला आहे.
कोविडमुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत लोकांची घरगुती बचत मोठ्या प्रमाणात वाढली होती. घरगुती ठेवी आणि कर्जातही वाढ झाली. तथापि, चलन आणि म्युच्युअल फंडामधील त्यांची होल्डिंग कमी झाली. आरबीआयच्या म्हणण्यानुसार खप जसजसा वाढत आहेत तसतशी लोकांची बचत कमी होत आहे. लोकांनी बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेतल्यामुळे कुटुंबांच्या बचतीमध्ये घट झाली आहे.
घरगुती वापरामध्ये वाढ आणि खुल्या खर्चात वाढ झाल्याने बचतीचा दर कमी होऊ लागला आहे. आरबीआयचं म्हणणं आहे की कोरोना कालावधीत देशांतर्गत बचतीचा दर वाढला असला तरी याचा अर्थ असा होत नाही की लोक त्यांच्या गरजा भागवण्यासाठी बचत करीत आहेत. कोरोना कालावधीत वाढती बेरोजगारी आणि उत्पन्नाचा अभाव यामुळे लोकांची खर्च करण्याची क्षमता कमी झाली आहे. म्हणूनच लोकांकडे जास्त पैसे शिल्लक आहेत. त्यामुळे घरगुती बचत दरामध्ये वाढ दिसून येत आहे.