मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये मुंबईतील शाळांबाबत अखेर निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.
आजच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचाही आढावा घेतला होता. आजपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. एकीकडे आता मुंबईत शाळांबाबत जो निर्णय घेण्यात आला आहे, तशाप्रकारचा निर्णय राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शाळांबाबत घेतला जातो का, याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय.
रविवारी विक्रमी रुग्णवाढ
रविवारी मुंबईत तब्बल ८ हजार ६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. शनिवारीही मुंबईत ६ हजार ३४७ रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे.
युवासेनेचे राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन कोरोनामुळे स्थगित
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रविवारी राज्यात १० हजाराहून अधिक रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी घेत अनेक राज्यांनी कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालसारखेच महाराष्ट्रात अंशत: लॉकडाऊन लागू शकते असे संकेत मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिले होते.
कोरोनामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता राजकीय मेळावे, कार्यक्रमांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या ८ व ९ जानेवारी रोजी होणारं युवासेनेचं राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित करत असल्याची माहिती युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रक काढून दिली आहे. या पत्रकात सांगण्यात आले आहे की, युवासेनेचे राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन नाशिक येथे ८ व ९ जानेवारी रोजी आयोजित केले होते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यात वाढणारा ओमायक्रॉनचा प्रभाव आणि वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता तरुणांच्या व नागरिकांच्या आरोग्याची काळजी व राज्य सरकारच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करण्याच्या सूचना युवासेनाप्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.
त्यामुळे युवासेनेचे राज्यव्यापी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. युवासेनेच्या या अधिवेशनाची पुढील तारीख राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रक काढून दिली आहे.