पुणे: महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणार्या कालीचरण महाराज यांना पुणेपोलिसांनी रायपूर तुरुंगातून ताब्यात घेतले असून आज दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येणार आहे. पुण्यातील शिवप्रताप दिन कार्यक्रमात समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले की, कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या ३ -४ दिवसांपासून पोलीस पथक रायपूरमध्ये होते. न्यायालयातून ट्रॉझिंट वॉरंट घेऊन मंगळवारी सायंकाळी कालीचरण महाराज यांना ताब्यात घेण्यात आले असून आज दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. कालीचरण महाराज यांना घेऊन काल सायंकाळी पोलीस पथक रस्तामार्गे निघाले आहेत. समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावरही गुन्हा दाखल आहेत. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पुण्यातील एका मेळाव्यात महात्मा गांधीविरोधात भडकाऊ भाषण करणाऱ्या कालीचरण महाराजाचे नाव वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये असल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी भूपेंद्र कुमार वासणीकर यांनी महाराजाची महाराष्ट्र पोलिसांची कोठडी मंजूर केली आहे. याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी महाराजाला ६ जानेवारीला पुणे न्यायालयात हजर करण्याचे आदेश प्रशासन आणि पोलिसांना दिले आहेत.
कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग याला छत्तीसगड पोलिसांनी खजुरोही येथील बागेश्वर धाम येथील घरातून अटक केली होती. २६ डिसेंबर रोजी रायपूरमधील टिकरापारा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत कलम ५०५(२) ( शत्रुत्व, द्वेष किंवा दुर्भावना निर्माण करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणारी विधाने) आणि २९४ (अश्लील कृत्ये) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कलम १२४ (ए) (देशद्रोह) आणि आयपीसीची इतर चार कलमे जोडली आहेत.
यात पोलिसांनी आरोप केला की, कार्यक्रमात कालीचरण आणि इतर आरोपी – मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे, मोहन शेटे, दीपक नागपुरे आणि कॅप्टन दिगेंद्र कुमार यांनी धार्मिक भावना दुखावणारी प्रक्षोभक भाषणे केली. धार्मिक हिंसाचाराला प्रोत्साहन देत या लोकांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांविरुद्ध कथित टिप्पणी केली आहे.
छत्तीसगडच्या रायपुर येथील धर्मसंसदेच्या जाहीर कार्यक्रमात कालीचरण महाराजाने महात्मा गांधींना शिवीगाळ करत गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचे कौतुक केले. या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना कालीचरण महाराजांनी नवा व्हिडीओ शेअर करत आता आगीत तेल टाकण्याचे काम केले. कालीचरण महाराजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ करण्याच्या वक्तव्यावरुन सभागृहात विरोधक आणि सत्ताधारीदेखील आमनेसामने आले होते.
कालीचरण महाराजाने महात्मा गांधींवर वंशवाद पसरवल्याचे आरोप करत काँग्रेसने त्याला अधिक खतपाणी घातल्याचे म्हटले आहे. यावेळी कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींप्रति द्वेषपूर्ण शब्दांचा वापर करत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जागी जर सरदार वल्लभभाई पटेल सत्तेवर तर भारत अमेरिकेच्याही पुढे असता असे म्हटले आहे. तर देश आर्थिक दृष्ट्या आघाडीवर असता असे म्हटले.