कंटेनमेंट झोनचे नियम ३१ मार्चपर्यंत कायम; केंद्र सरकारचे कडक धोरण

नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ व अन्य सात राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने अधिक कडक भूमिका घेतली आहे. कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच कंटेनमेंट झोनबाबत केलेले नियम ३१ मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राने याआधी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी या नऊ राज्यांनी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच नागरिकांनी नियम पाळावेत म्हणूनही फारसे प्रयत्न या राज्यांनी केले नसल्याचा केंद्राचा दावा आहे. राज्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलली नाहीत तर आम्ही अधिक कडक धोरण राबवू, असा इशारा केंद्राने दिला आहे. कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा कालावधी महिनाभर वाढविण्यात आला आहे.
राज्यात ८ दिवसांत ५५ हजार नवे रुग्ण; मुंबई, पुण्यात विविध निर्बंधांबाबत चाचपणी सुरू
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात कठोर निर्बंध लागले जात आहेत. मागील आठ दिवसात तब्बल ५५ हजार नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते रूग्ण आणि दुसरीकडे बरे होणाऱ्यांची संख्या मर्यादित झाल्याने राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या ६७ हजारांवर पोहचली आहे.
वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरातही विविध निर्बंधांबाबत चाचपणी सुरू आहे. आज दिवसभरात ८ हजार ३३३ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१ लाख ३८ हजार १५४ झाली आहे. तर, दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५२ हजार ४१ नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४३ टक्के एवढा आहे.
मुंबईत तिसऱ्या दिवशी किंचित घट
मुंबईत बुधवारपासून सलग दोन दिवस ११६७ आणि ११४५ बाधित रुग्णांची नोंद झाली. यात थोडी घट होऊन शुक्रवारी १०३४ बाधित रुग्णांची नोंद झाली.