स्वबळाच्या भूमिकेला काँग्रेसची मुरड; आघाडीचाही पर्याय खुला ठेवणार !

मुंबई : अलीकडे झालेल्या नगर पंचायतींची निवडणूक स्वबळावर लढविणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आता इतकी टोकाची भूमिका न घेता स्वबळ आणि महाविकास आघाडीत राहून लढणे, असे दोन्ही पर्याय खुले ठेवण्याची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत या विषयावर मंथन झाले.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढल्याने महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन झाले आणि ती बाब काही ठिकाणी भाजपच्या पथ्यावर पडली, अशी टीका झाली होती. त्याचवेळी स्वबळावर लढण्याचा फायदा म्हणजे प्रत्येक नगर पंचायतीत काँग्रेसचे अस्तित्व दिसले, असे समर्थनही दिले गेले होते. या निकालावर नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली.
महापालिका, जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, अशी भूमिका ठेवण्याऐवजी आघाडीचा पर्यायही खुला ठेवावा. त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर द्यावेत. वेगळे लढल्याने भाजपचा फायदा होणार असेल तर ते टाळून आघाडी करावी, असा सूर व्यक्त झाला.
बैठकीसाठी गेलेले ऊर्जा मंत्री नितीन राऊत बैठकीला उपस्थित न राहताच परतल्याची चर्चा होती. तसे काहीही घडल्याचा राऊत यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, माझी एच. के. पाटील यांच्याशी सकाळी १० वाजता भेट आधीच ठरलेली होती. त्यानुसार मी गेलो आणि त्यांना अर्धा तास भेटून परतलो. आजच्या बैठकीला मी उपस्थित राहण्याचा प्रश्नच नव्हता.