पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. राजीव सातव यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी १० वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेल्या राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते गेल्या २३ दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.
रणदीपसिंग सुरजेवाला यांचे ट्विट
निशब्द !
आज एक ऐसा साथी खो दिया जिसने सार्वजनिक जीवन का पहला कदम युवा कांग्रेस में मेरे साथ रखा और आज तक साथ चले पर आज…
राजीव सातव की सादगी, बेबाक़ मुस्कराहट, ज़मीनी जुड़ाव, नेत्रत्व और पार्टी से निष्ठा और दोस्ती सदा याद आयेंगी।
अलविदा मेरे दोस्त !
जहाँ रहो, चमकते रहो !!! pic.twitter.com/5N94NggcHu
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 16, 2021
राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून कोरोनाची लक्षणं जाणवत होती. २२ तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर २३ एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. २८ तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी २२ एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.
४५ वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत १०७५ प्रश्न विचारत २०५ वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
राजीव सातव यांनी स्वतःहून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.
सातव यांच्या शरीरात आढळला ‘सायटोमॅजिलो’
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गाानंतर उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला होता. हा व्हायरसही नवीन प्रकारचा असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात होते. मात्र, यामुळे सामटोमॅजिलो व्हायरस नेमका काय आहे याविषयी माहिती असणं आवश्यक आहे.
सायटोमॅजिलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेतील ४० वर्ष पूर्ण असलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात तो आढळून येतो. हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांकडे लाळ किंवा थुंकीद्वारे प्रसारित होतो. या विषाणू संसर्गामुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात.
ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात रोग प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्यांवर या विषाणूचा प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो. सायटोमॅजिलोची प्राथमिक लक्षणं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतात. डोकेदुखे, श्वास घेताना कमतरता जाणवते. ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्ग झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी रक्त चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो. सायटोमजिलो झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी रक्त चाचणी आणि इतर मार्गांचा वापर केला जातो.